दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नांदेड

सात हजाराहून अधिक सर्पदंशीत रुग्णांचे जीव वाचवणारे नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे डाॅ.दिलीप पुंडे सांगताहेत…..नाती कृतज्ञतेची असावी…

एम.बी. कवठेकर...

 

१० ऑक्टोबर १९९९ ची ही घटना… रात्रीचा १ वाजलेला .. अन् एक रुग्ण टेंम्पोमध्ये आणला होता आणि सोबत बरीच माणसे होती… ती जोरजोरात रडत होती… मी तो आवाज ऐकून धावतच खाली गेलो… रुग्णाला खाली घ्यायला सांगितले… रुग्णाचे आईवडील म्हणत होते, की आमचा एकुलता एक मुलगा गेला… मी टेंम्पोत जाऊन त्या रुग्णाला तपासले…त्याच्या डाव्या कानाला मण्यार या विषारी सापाचा दंश झाला होता….

नुकताच त्याचा श्वास गेला होता अन् ह्दयाची शेवटची धडधड चालू होती… मी त्याला कवेत उचलून हॉस्पिटलमध्ये आणले… श्वास नलिकेत नळी टाकून त्याला Ambu bag च्या सहाय्याने कृत्रिम श्वास द्यायला सुरुवात केली… मुखेडसारख्या ठिकाणी त्यावेळी व्हेंटिलेटर व Ambulance ची सोय नव्हती, पावसामुळे त्याला इतरत्रही कुठं हलवणे शक्य नव्हतं… कृत्रिम श्वास देण्यासाठी त्या Ambu bag ला सारखे दाबावे लागत होते… दरम्यानच्या काळात रुग्णाचे नातेवाईक म्हणत होते की, हा रुग्ण गेला… पण मी हार मानली नाही…

तब्बल 42 तास आम्ही त्याला कृत्रिम श्वास देत होतो… खूप प्रयत्नानंतर अखेर तो रुग्ण ठणठणीत बरा झाला… त्याचे नाव आहे शिवराज दगडू पवळे रा. गोणार ता. कंधार जि. नांदेड अन् वय होतं वर्षे अवघे अकरा… अधून मधून त्याचे आईवडील त्याला घेऊन दवाखान्यात मला भेटायला येत असत… एक वेगळं कौटुंबिक नातं आमच्यात तयार झाले होते… पुढं 10 वर्षानंतर त्याचे लग्न ठरले आणि त्याच्या आईवडिलांनी आम्ही लग्नाला यावं असा हट्ट धरला… मी व आमच्या रुग्णालयातील स्टाफ त्याच्या लग्नाला गेलो… त्यांचं 2-3 रुमचे घर त्यांनी आम्हाला फिरून दाखवले…

घर पाहताना माझ्या लक्षात आलं की, देवघरात त्यांनी माझा फोटो ठेवलाय… ही परिस्थिती पाहून मी क्षणिक भारावून गेलो… तो म्हणाला की, मी रोज तुमच्या फोटोला नमस्कार करतो… मी त्याला विनोदाने म्हणालो की, बाबा नमस्कार कर पण फोटोला हार घालू नको… अजून मला खूप काही करायचे आहे… *Miles to go before I sleep and miles to go before I sleep*… रुग्णाची व त्याच्या कुटुंबाची ती कृतज्ञतेची भावना माझ्या कार्याची पावती होती…दुकानदाराकडून खरेदी केल्यानंतर ब-याचदा आपल्याला पावती मिळत नसेल पण… गरीबातला गरीब रुग्ण डॉक्टरांना त्यांनी केलेल्या कार्याची पावती नक्की देतो…

या घटनेची स्लाइड मी औरंगाबाद, चंद्रपूर आणि आसाममधील तेजपूरच्या वैद्यकीय परिषदेत माझ्या व्याख्यानात दाखवली… त्यात लोकांनी मला standing ovation दिले…

मला याची जाणीव आहे की मी ग्रामीण भागात आहे… कदाचित माझा खिसा रिकामा असेल पण हृदय प्रेमानं ओथंबलेलं आहे, मोठ्या शहरात राहिलो असतो तर माझा खिसा भरलेला असता – पण माझं हृदय रिकामं राहिले असते… गरीब माणूस प्रेम, आपुलकी, जिव्हाळा व क्षमतेनुसार पैसेही देतो… त्या शिवराजलाही आता दोन अपत्ये आहेत. ते शेतकरी कुटुंब सातत्याने माझ्याकडे येत असते…

शेकडो रुग्णांनी दिलेल्या कार्याच्या पावतीमुळे या ग्रामीण भागात काम करायला उर्जा मिळते. या रुग्णांनी दिलेले मानसन्मान हेच माझ्या कार्याची उर्जा आहे. एक उच्चशिक्षित डॉक्टर ग्रामीण भागात गेला तर समाजाला याचा खूप फायदा होतो. MD उत्तीर्ण झाल्यानंतर मुंबईचे जसलोक हॉस्पिटल सोडून ‘खेड्याकडे चला’ या ध्येयाने मी 1988 ला मुखेड, जि.नांदेडच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो. नुकतेच लग्न होऊन माझी सुविद्य पत्नी सौ. माला शहरातून मुखेडसारख्या खेड्यात माझ्या जीवनात आली. राहण्यास घर नव्हते, शौचालयाची सुविधाही नव्हती… माझी लढाई केवळ रुग्णांच्या आजारांशी नाही तर ती दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रध्दा आणि आधुनिक साधनांचा अभाव इ. शी होती…

आजवर मला सर्पदंश झालेल्या 7000 रुग्णांना सेवा देण्याची संधी मिळाली. 1988 ला या भागात सर्पदंशाने मृत्यूची संख्या ही जवळपास 25% होती, आज हा मृत्यूदर 0.98% पर्यंत खाली आला आहे. आमचे उद्दिष्ट असे आहे की, भविष्यात हा मृत्यूदर 0% करायचा… या भागात नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे विषारी जातीचे साप आढळतात. डोंगराळ भाग, अतिउष्ण हवामान, दगडा-मातीची घरं, अंधश्रद्धा, दारिद्र्य, अज्ञान आणि शेती हा प्रमुख व्यवसाय यामुळे या भागात सर्पदंशाचं प्रमाण अत्यंत जास्त आहे..

आज आम्ही सर्पदंश जनजागरण मोहीम राबवतो यातून आजवर 5 लाखांहून अधिक लोकांचे मोफत जनजागरण करण्यात आले आहे.*Mission zero mortality,Teach One Each One आणि Save the Saviour*ही आमची उद्दिष्टे
आहेत .गरीब शेतकरी व शेतमजूर या अपघातातून जगला पाहिजे.सर्पदंशावर संशोधनात्मक कार्य चालू आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांमध्ये 7 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. सर्पदंश व्यवस्थापनावर काम करण्याची व देशासाठी मार्गदर्शक तत्त्वे लिहण्याची संधी मला मिळाली(Standard treatment Guideline Committee of India for Snake bite management) यामुळेच हा प्रवास गल्ली टू ग्लोब गेला आणि मला 29 सप्टेंबर 2015 साली भारताच्या वतीने Oxford विद्यापीठात जागतिक विष परिषदेत सर्पदंशाविरुद युद्ध’ या विषयावर व्याख्यान देण्याची संधी मिळाली…

2021 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्पदंश तज्ज्ञ समिती (Roster of Experts) मध्ये माझा समावेश केला. ही संधी मला या गोरगरीब रुग्णांमुळेच मिळाली… .मला सेवेची संधी देणारे माझे सर्व रुग्ण, माझे आईवडील, माझी पत्नी सौ.माला, गुरुजन, प्रसार माध्यमे व दवाखान्यातील सर्व कर्मचारी- या सर्वांप्रति मी सदैव कृतज्ञ आहे.

रुग्ण हा डॉक्टरांच्या सेवेचा खरा गाभा असतो. डॉक्टरांना मोठे करणारा हा रुग्णच असतो… ही नाती जोपासण्याचा प्रयत्न मी आजही करतोय… आजमितीस वैद्यकीय क्षेत्र अमर्याद, अपूर्ण, अस्थिर आणि असुरक्षित जरी असलं तरी ग्रामीण भागात काम करत असताना असेही रुग्ण भेटतात की डॉक्टरांच्या प्रति ते कृतज्ञता व्यक्त करतात…

डॉक्टरांच्या जीवनातील सुखाचे क्षण म्हणजे दीर्घकाळ कोमात असलेला रुग्ण अचानक शुद्धीवर येणे, शॉक दिल्यानंतर थांबलेल्या हृदयाची धडधड सुरू होणे, एखादी माता अडली असता बाळाच्या रडण्याचा आवाज येणे, एखादा मुलगा भेटल्यानंतर सर, मलाही तुमच्या सारखं डॉक्टर व्हायचे आहे असं म्हणणे व क्वचित प्रसंगी रुग्ण विचारतो की – डॉक्टर तुमची तब्येत कशी आहे ?…
हे आणि अशा अनेक अनुभवांनी मी समृद्ध झालो आहे आणि अनेक रुग्णांशी माझे नातं अधिक घट्ट आणि वृद्धिंगत व्हावं हीच विधात्याच्या चरणी प्रार्थना… ??

*डॉ. दिलीप पुंडे*
सदस्य, सर्पदंश तज्ज्ञ समिती,
जागतिक आरोग्य संघटना (WHO)
पुंडे हॉस्पिटल, मुखेड जि. नांदेड
ईमेल : drpundedp@gmail.com
संवाद : 9422874826

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे