कंधार ता. प्रतिनिधी : सध्या शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, कुत्रे रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींवर धावून जात हल्ले करीत आहेत. गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध भागांत लहान मुलांसह १७ जणांना चावा घेतला आहे. यातील काहींवर कंधार ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर काहींना नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील काही भागात तर कुत्र्यांचा धुमाकुळ सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. चालू आठवडयात सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत १७ जणांना एकाच मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार घडला. यात माजी नगरसेवक, पोलिस कर्मचारी लहान मुलांसह वयस्क व्यक्तीचाही समावेश आहे. यातील काहींवर कंधार ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर काहींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
शहरातील काही भागात तर रस्त्यावर दिसेल त्या वाटसरूंवर कुत्रे हल्ले करीत आहेत. सकाळी शाळा भरते वेळी आणि शाळा सुटली की विद्यार्थ्यांचा हे मोकाट कुत्रे पाठलाग करतात. शहरातील मुख्य चौकांत दहा ते पंधरा कुत्री ठाण मांडूनबसलेली असतात. या प्रकारामुळे लहान मुलांना शाळेत किंवा घराबाहेर खेळण्यास जाऊ द्यायचे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असताना पालिका प्रशासन झोपा काढते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रकार शहरातील एखाद्या ‘परिसरापुरता मर्यादित नसून प्रत्येकच भागात बेवारस कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसून येत आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्याने ये-जा करणे नागरिकांना कठीण झाले आहे. दुचाकीवरून जाणाऱ्यांचाही हे कुत्रे पाठलाग करत चावा घेत आहेत. कुत्र्यांच्या भीतीपोटी वाहनचालक दुचाकी वेगाने दामटतात, अशा वेळी वाहन खड्ड्यात आदळून किरकोळ अपघात घडल्याने वाहनधारक जायबंद झाले आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे. नगर पालिकेने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
शहरातील एकही परिसर मोकाट कुत्र्यांपासून सुटला नाही. कुत्र्यांची संख्या आटोक्यात राहावी यासाठी नगरपरिषदेने कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे गरजेचे आहे, मात्र कंधार नगरपरिषदेकडून याकडे दुलंक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. परिणामी मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यातून शहरवासीयांचा धोकाही वाढला आहे.