कंधार (एम. जे. सय्यद): स्वार्थी राजकारणा मुळे कंधार शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंतच्या मुख्यरस्त्याचे काम गत दहा वर्षा पासून रखडून पडले होते.रस्त्याचे काम होत नसल्याने नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.आता कुठे या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली असून या कामातही पक्षपाती मोजणी करून नालीचे बांधकाम अर्धवट थांबविले आहे.तर रस्त्याचे रूंदीकरणही कमी केली जात आहे.करिता रस्त्याचे होत असलेले काम इस्टिमेंट प्रमाणे रितसर मोजणी करून छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाली करावी.अशी मागणी बौद्धव्दार वेस कंधार येथील नागरिकांच्या वतीने उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उप विभाग कंधार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काम हे इस्टिमेंट प्रमाणे होत नसून पक्षपाती मोजणी करून सार्वजनिक शौचालया ठिकाणी नालीचे बांधकाम अर्धवट थांबविण्यात आले आहे.पुढे नालीचे बांधकाम नाही केल्यास रस्त्याचे व हाॅटेलचे सर्व घाण पाणी आमच्या गल्लीत जमा होऊन घरामध्ये ही शिरते.त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण होवून रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.असे होवू नये यासाठी सार्वजनिक शौचालया पासून छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत नालीचे बांधकाम करून घाण पाणी व रोगराई पासून आमचे संरक्षण करावे.
तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृत्ती पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंतच्या रस्त्याचे मोजमाप जाणिवपूर्वक कमी करून पक्षपाती पध्दतीने रस्त्याची रूंदी कमी केली जात आहे.करिता रितसर मोजणी करूनच रस्ता,फुटपाथ व नालीचे बांधकाम करून आम्हाला न्याय द्यावा.अन्यथा आपल्या कार्यालया समोर अमरण उपोषण करण्याचा इशाराही बौद्धव्दार वेस येथील नागरीकांच्या वतीने उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप विभाग कंधार यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.या निवेदनावर रविराज सोनकांबळे,संदीप कांबळे,कुमार कांबळे,विनय कदम,विनोद कांबळे,कुणाल कांबळे,सुमित ढवळे,अभय कांबळे,प्रविण ढवळे,संभाजी मिरकुटे,शितलकुमार भगत,ईसुफ बागवान,जितेंद्र ढवळे,ॲड.सिध्दार्थ वाघमारे,अविनाश वाघमारे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या असून या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी कंधार,उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार,तहसीलदार कंधार,मुख्याधिकारी नगर परिषद कंधार,पोलीस निरीक्षक कंधार आदींना दिल्या आहेत.