पशू कत्तलीसाठी वाहतूक; बैल-म्हशींसह संशयित वाहन पोलिसांच्या ताब्यात; दोघांवर गुन्हा दाखल

शेवगांव प्रतिनिधी|भेंडा बु. (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथील विशाल रमेश शिंदे (वय 24, व्यवसाय-शेती) यांनी शेवगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता विशाल व त्यांचा मित्र तुषार सिद्देश्वर भातांबरे (रा. चिलेखनवाडी) हे मढी येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर ते वडूलेमार्गे भेंडा येथे जात असताना, दुपारी 1 वाजता, वडूले येथे एका टाटा एसीई (छोटा हत्ती) गाडी क्रमांक एम.एच. 16 ए.व्ही. 1921 मध्ये दोरीने अत्यंत क्रूरपणे बांधलेले एक बैल व एक म्हैस वाहतूक करत असल्याचे त्यांना दिसले.सदर वाहन थांबवून चौकशी केल्यावर चालकाने आपले नाव जाकीर अमीर सय्यद (वय 54, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव) असल्याचे सांगितले. तसेच जनावरे जावेद (पूर्ण माहिती नाही, रा. शेवगाव) यांची असल्याचे नमूद केले. कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याचा संशय असल्याने विशाल व तुषार यांनी वाहनासह जनावरे शेवगाव पोलीस स्टेशनला नेले.
पोलिसांनी पंचनामा करून खालीलप्रमाणे जनावरांचा तपशील नोंदवला:
1. अंदाजे 20,000 रुपये किंमतीचा पांढऱ्या-काळ्या रंगाचा, 5 वर्षे वयाचा गावरान खिलार जातीचा बैल,
2. अंदाजे 20,000 रुपये किंमतीची काळ्या रंगाची, 5 वर्षे वयाची महसान जातीची म्हैस.
पोलिसांनी वाहन व जनावरे जप्त करून आरोपी जाकीर अमीर सय्यद व जावेद यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारणा 1995) अंतर्गत कलम 5, 53, 9 व 11 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.