हरवलेली माता “मानवसेवा” च्या उपचारानंतर पोहचली कुटुंबात
रस्त्याच्याकडेला असलेल्या निराधार मनोरुग्णांची सुटका करणे, सुटका झालेल्या निराधारांना मोफत अन्न, वस्त्र, निवारा आणि मानसिक उपचार प्रदान करणे, त्याचबरोबर निराधारांचे पत्ते शोधण्यासाठी देशात कोणत्याही भागात त्यांच्या हरवलेल्या कुटुंबांसोबत त्यांना पुन्हा एकत्र करणे, शहर, खेडी, कुटुंबे, पोलिस कर्मचारी, रेल्वे अधिकारी आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याचे कार्य श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून करीत आहे.
अरणगाव परिसरात किर्र काळोखात लॉकडाऊनमध्ये फिरणाऱ्या एका निराधार मानसिक विकलांग मातेला दि. २४ एप्रिल २०२१ रोजी अरणगाव येथील ग्रामस्थांनी संस्थेच्या “मानवसेवा” प्रकल्पात दाखल केले होते. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने या मातेवर उपचार करण्यात आले. समुपदेशन आणि उपचारतून सावरल्यावर या मातेने आपल्या कुटुंबाची व गावाची माहिती दिली. संस्थचे स्वयंसेवक अंबादास गुंजाळ, सुशांत गायकवाड, राहुल साबळे, सोमनाथ बर्डे, सिराज शेख संस्थेच्या अध्यक्षा पुजा मुठे यांनी कुटुंबाची खात्री करुन शिरुर पोलीसांच्या मदतीने या मातेला दि. ०२ जानेवारी २०२४ रोजी कुटुंबात पोहचवून पुनर्वसन केले. तब्बल पाच वर्षांनी ही माता कुटुंबात पोहचताच कुटुंबीयांच्या चेह-यावर आनंद पाहावयास मिळाला.
*मानवसेवा हीच ईश्वर सेवा!*