नेवासा तालुक्यातील अवघ्या तेरा वर्षीय मुलीचे लग्न…. गुन्हा दाखल
नेवासा प्रतिनिधी।बालविवाह कायदा असतानाही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक बालविवाह पार पडले आहे. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असतानाही असे प्रकार सर्रास घडू लागले आहे.नुकतेच असाच एक प्रकार जिल्ह्यात घडला आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याची घटना नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथे घडली.याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून पीडितेची आई, मावशी व काका यांचेसह नवरा, सासू-सासरा व आई-वडील यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा तालुक्यातील एका गावातील इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीचे काही दिवसांपूर्वी लग्न लावून देण्यात आले.सासरी गेल्यानंतर पतीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तसेच घरकाम येत नाही म्हणून पती, सासू-सासरा मुलीस सतत शिवीगाळ करून मारहाण करत होते. तसेच मुलीस एका भोंदूबाबाकडे नेण्यात आले त्याने तिला मारहाण केली.त्यानंतर मुलीच्या पतीने तिला माहेरी काढून दिले.आईने मुलीला तिच्या आजोबाकडे पाठविले. मुलीने सर्व प्रकार आजोबास सांगितला. त्यानंतर याप्रकरणी फिर्याद देण्यात आली. त्यानुसार या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.