जिल्ह्यातील उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर
नगर प्रतिनिधी।जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या 203 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या असून, 29 डिसेंबर ते 1 जानेवारी या चार दिवसांच्या कालावधीत उपसरपंच निवड होणार आहे.थेट जनतेतून निवडून नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्या 203 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी निवडणुका झाल्या. या निवडणुकांचा 20 डिसेंबरला निकाल जाहीर होऊन, 23 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने विजयी उमेदवारांची नावे राजपत्रात प्रसिध्द केली आहे. विजयी उमेदवारांची नावे प्रसिध्द झाल्यानंतर आठ दिवसांत सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. या निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवडणूक होणार आहे.
उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया प्रशासकीयदृष्ट्या सुरळीतपणे पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ब वर्ग अधिकार्यांची निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. यामध्ये नायब तहसीलदार, मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, भूमिअभिलेखचे उपअधीक्षक,गटशिक्षणाधिकारी, उपअभियंता, सहाय्यक निबंधक व पशुधनविकास अधिकारी याचा समावेश आहे.
29 डिसेंबरला 152 गावांत निवडणूक
203 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक 152 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाची निवडणूक 29 डिसेंबर रोजी होणार आहे. यामध्ये राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या साकुरी, तिसगाव, कोल्हार, कमालपूर,माहेगाव देशमुख, घुलेवाडी, भाळवणी,ढवळपुरी, बनपिंप्री, काष्टी, बेलवंडी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 30 डिसेंबर रोजी जोर्वे, तळेगाव दिघे, कोल्हेवाडी, करंजी बु.,नेप्ती, वाळकी, सावळीविहिर बु. आदी 34 ग्रामपंचायती, 31 डिसेंबर रोजी भेंडा बु.,पिंपळगाव लांडगा, चांदेकसारे यासह 13 ग्रामपंचायतींच्या तर 1 जानेवारी रोजी साकुरसह चार ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाची निवडणूक होणार आहे.