अहमदनगर ब्रेकिंग ! वाळू तस्करास अटकपूर्व जामीन मंजुर
प्रतिनीधी : मयुर मांडलिक ( देशरत्न न्युज )
अहमदनगर : पारनेर पोलीस स्टेशन येथे भा द वी कलम ३८९ , ३४१ , ५०४ , १८६ , ३४ व पर्यावरण कायदा कलम ३/१५ या कलमान्वये दाखल गुन्ह्यातील आरोपीस अहमदनगर येथील मा . सत्र न्यायालयाने नुकताच अटकपुर्व जामिन मंजूर केला . सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत –
पारनेर तहसिल कार्यालयातील कर्मचारी वाळू लिलाव गट पाहण्यासाठी जात असताना त्यांना एम.एच.-१६ए.वाय.-७०९५ ही वाळूची ट्रक कुरुंद गांवाकडे जाताना दिसली. त्यावेळी त्यांनी सदर ट्रकचा पाठलाग करुन गाडी थांबवली. सदर गाडीमध्ये २ ब्रास वाळूची बेकायदा वाहतुक होत असल्याची बाब निदर्शनास आली. ट्रकच्या चालकाकडे रॉयल्टीच्या पावत्या मिळून आल्या नाही . त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी ट्रक चालकास सदरची ट्रक तहसिल कार्यालय, पारनेर येथे घेण्यास सांगितली. त्यावेळी सदर ट्रकमध्ये महसुलचे एक कर्मचारी बसले होते . वाळूची ट्रक तहसिल कार्यालयाकडे घेऊन जात असताना गव्हाणवाडीजवळ मोटारसायकलवर दोन इसम ट्रकला आडवे आले व त्यांनी महसूल कर्मचाऱ्यास अरेरावीची भाषा वापरुन जबरदस्तीने ट्रक सोडविली व पसार झाले .
याबाबत संबंधित कर्मचाऱ्याने पारनेर पोलीस स्टेशन येथे ट्रक चालक व दोन अज्ञात इसम यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. तेव्हापासून दुचाकी आडवी घालणारे इसम फरार होते. दरम्यान सदर गुन्ह्यासंदर्भात श्रीगोंदा तालुक्यातील एका वाळुतस्काराच्या मागावर पोलीस होते. पोलीस कोणत्याही क्षणी अटक करतील याची चाहूल लागल्यानंतर आरोपीने अहमदनगर येथील मा. सत्र न्यायालयामध्ये अटकपुर्व जामिन मिळणेकरीता अर्ज दाखल केला होता . सदर प्रकरणाची नुकतीच न्यायालयामध्ये सुनावणी झाली . आरोपीच्या वकीलांनी सदर गुन्ह्याशी आरोपीचा काहीही संबंध नसल्याचा युक्तीवाद केला. आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मा. सत्र न्यायालयाने दि . १६/०७/२०२२ रोजी आरोपीस अटी व शर्तीवर जामिन मंजूर केला.
आरोपीच्या वतीने ॲड . प्रशांत मोरे व ॲड . महेश गायकवाड यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड . देवा थोरवे, ॲड . सुभाष वाघ, ॲड. स्नेहल सरोदे, ॲड. अंशाबापु पुंड, ॲड . हनुमान सपकाळ, ॲड. सविता शिंदे यांनी सहकार्य केले.