जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मिशन वात्सल्य’ योजनेची अंमलबजावणी करावी;पालकमंत्री यांनी दिले आदेश
कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीची पालकमंत्र्यांसोबत चर्चा
अहमदनगर प्रतिनिधी। शनिवार दिनांक 23 ऑक्टोबर 2021 रोजी अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी एकल महिला पुनर्वसन समितीचे जिल्हा समन्वयक अशोक कुटे व तालुका समन्वयक प्रकाश इथापे यांनी पालक मंत्री यांच्यासोबत शासकीय मिशन वात्सल्य योजनेची अंमलबजावणी होणे, कोरोना काळातील अतिरिक्त बिलाचे ऑडिट होण्याबाबत निवेदन देऊन चर्चा केली. नगर, पारनेर, संगमनेर या तालुक्यात मिशन वात्सल्य योजनेबाबत काहीच काम झालेले नाही हे निदर्शनास आणून दिले. शुक्रवारी अकोले तालुक्याच्या दौऱ्यामध्ये आमदार किरण लहामटे व पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी देखील हसन मुश्रीफ साहेबांसोबत सविस्तर चर्चा केली होती. त्या अनुषंगाने मुश्रीफ साहेबांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना मिशन वात्सल्य योजनेची काटेकोरपणे जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेश दिले आहेत.
त्याचबरोबर त्यांनी या एकल (विधवा )महिला यांच्यासाठी रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावा, त्यांची भाऊबीज चांगली साजरी होण्यासाठी सर्व तहसीलदार, महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी यांनी स्वतः जातीने लक्ष घालण्याची सुचना केली आहे. हे सर्व असंघटीत कामगाराचे कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांची फार कर्जे थकलेली आहेत. त्याबाबतही लक्ष घालण्याच्या मुश्रीफ साहेबांनी सूचना दिल्या.
पत्रकार परिषदेनंतर पुनर्वसन समितीने आमदार निलेश लंके व आ.आशुतोष काळे यांच्यासोबत महिलांच्या काही अडचणी बाबत चर्चा केली. यापूर्वी देखील समितीने जिल्हाधिकारी महोदय यांना दोन वेळा निवेदने दिलेली आहेत,
जोपर्यंत जिल्हाधिकारी महोदय पुनर्वसन समिती सोबत अभ्यासपूर्ण बैठक घेत नाहीत, तोपर्यंत या एकल महिला व अनाथ मुलांना न्याय मिळू शकत नाही असे मत अशोक कुटे, प्रकाश इथापे यांनी व्यक्त केले. आत्तापर्यंत अनेक वेळा फक्त आश्वासने मिळाली परंतु अजून जिल्हाधिकारी महोदयां सोबत बैठक होऊ शकली नाही. यावेळी आमदार निलेश लंके व आमदार आशुतोष काळे यांनी देखील सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.