शेवगाव /देशरत्न वृत्तसेवा।अहमदनगर जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घेतले आहे. ज्या गावात दहा पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळतील ते गावातील अत्यावश्यक सेवा वगळता गावची गावे बंद केली आहेत. यामध्ये शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील गावाचा समावेश आहे.भातकुडगांव पासून भातकुडगांव फाटा तीन कि.मी. पेक्षा जास्त अंतर असतांनाही प्रशासनाने भातकुडगांव फाट्यावरील व्यावसायिकांवर निर्बंध लादले आहेत.
शेवगाव – नेवासा राज्यमार्गावरील भातकुडगांव फाटा येथील सर्व व्यवहार कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी बंद करण्याचे आवाहन करताना तालुका प्रशासनाचे अधिकारी.
शेवगाव- नेवासा राज्यमार्गावरील भातकुडगांव फाट्यावरील किराणा दुकानासह सर्व व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करत व्यवसाय बंद ठेवले आहेत. मात्र जुलैमध्ये आँनलाईन ( बिंगो ) मटक्याच्या टपरीला तत्कालीन तहसिलदार सौ.अर्चना पागिरे यांनी टाळे ठोकले होते. त्यावेळी अवैध धंदे करणारांचे धाबे दणादणले होते.सध्या तहसीलदार म्हणून मच्छिंद्र वाघ हजर झाले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार भातकुडगांव व फाटा येथील सर्व व्यवहार बंद केले असले तरी ऑनलाईन ( बिंगो )मटका सुरु झाला आहे.
ओ साहेब, कोरोना महामारीचे निर्बध कुणाला ? भातकुडगांव फाट्यावर किराणा दुकानदार कोमात, अवैध धंदे जोमात अशी परिस्थिती अनुभवायला मिळत आहे.
गेल्या दिड वर्षापासून तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने महसूल प्रशासन चिंतेत आहेत.भातकुडगांव येथे कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने शेवगांवच्या तत्कालीन तहसीलदार अर्चना पागिरे भातकुडगांव येथे जात असताना भातकुडगांव फाट्यावर गर्दी दिसून आली. तहसिलदार पागिरे यांनी गर्दी कशासाठी झाली हे बघण्यासाठी त्यांंनी टपरीकडे धाव घेतली. जावून बघतात तर त्या ठिकाणी चक्क आँनलाईन मटका ( बिंगो ) खेळताना वीस पंचवीस तरुण दिसले. तहसीलदार ची गाडी बघून सर्वानी धुम ठोकली.
आम्ही पोलीस प्रशासनाला हप्ते देतो.तुम्ही आमच्या वर कारवाई करु शकत नाही. असे मटका चालविणाऱ्या तरुणांंनी तहसीलदार पागिरे यांंना म्हणताच पागिरे संतापल्या.त्यांनी लगेच जिल्हा पोलीस अधिका-यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली होती.
तहसीलदार यांनी दोन नवीन कुलूप आणून आँनलाईन मटका ( बिंगो ) टपरीला टाळे ठोकले होते. तेव्हा पासून ऑनलाईन मटका खेळला जात नव्हता.त्यामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात होते.
अवैध धंद्याना आश्रय कुणाचा ?
सध्या कोरोना महामारीचे संकट आहे. कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार सर्व व्यवसाय बंद आहेत. तरीही शेवगाव- नेवासा राज्यमार्गावरील भातकुडगांव फाटा येथील ऑनलाईन ( बिंगो ) मटका कुणाच्या कुणाच्या आश्रयाने चालू आहेत. याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
या मार्गावरून उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे प्रवास करत असताना त्यांना ही टपरी दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या ऑनलाईन मटक्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. काही पती, पत्नीचे भांडणे होत असल्याने संसार मोडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील काय भूमिका घेतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.