कंधार प्रतिनिधी: आजादी का अमृत महोत्सवानिमित्त कंधार तालुक्यात दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार कंधार ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने दिनांक 8, 15, 22, 29 जुलै या कालावधीत दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरास अस्थीव्यंग तज्ञ डॉ. विजय कागणे, नेत्ररोग तज्ञ डॉ. योगेश, औषध वैद्यक डॉ. अभिषेक कावरा, बालरोग तज्ञ डॉ. सुधाकर बंटेवाड, मनोविकृती तज्ञ डॉ. रोहित ठक्करवाड आदी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात दि. 8 जुलै रोजी बहादरपुर व शिराढोण, 15 जुलै रोजी कौठा, 22 जुलै रोजी पेठवडज, 29 जुलै रोजी फुलवळ व कुरुळा अशा एकूण 6 जि. प. गटातील दिव्यांग व्यक्तींची मोफत तपासणी करून प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, व कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांनी केले आहे.