जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार आहेत…..राज ठाकरे
मुंबई प्रतिनिधी।”राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाले. जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार आहेत.” असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केला.”आपणच जातीपातीतून बाहेर पडणार नसू तर मग हिंदू कधी होणार असा सवाल करून महाराष्ट्र जातीपातीत खितपत पडला” असे विधान राज ठाकरे यांनी केले. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर आज आयोजित सभेत ते बोलत होते.राज ठाकरे म्हणाले, “जातीपातीचे राजकारण काही लोकांना हवे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाले. त्याआधीही जात होती, पण जातीचा अभिमान होता. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला,” असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.जातीपातीत अडकून पडणार असू तर कसले हिंदुत्व आपण घेऊन बसलो. हिंदू केवळ हिंदू-मुस्लीम दंगलीतच हिंदू असतो. राष्ट्रीय उत्सवाला तो भारतीय असतो. चीनने आक्रमण केले की त्याला कळतच नाही आपण कोण आहोत? हिंदु आणि भारतीय नसतो तेव्हा तो मराठी, गुजराती, तमीळ, बंगाली, पंजाबी होतो आणि जेव्हा मराठी असतो त्यावेळी तो मराठा, ब्राह्मण, माळी होतो असेही ते म्हणाले.