कमी भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका…..
कंधार प्रतिनिधी।गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्गाला अनेक वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाऊस ऊन वादळ कीड रोगराई यांमुळे शेतकऱ्यांना भरपूर नुकसान सोसावे लागत आहे. परंतु सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, हे नगदी पीक गेले. त्यातच बागायती पिकालाही मोठा फटका बसला आहे. राज्यातील केळी उत्पादक शेतकरी पडलेल्या भावामुळे चिंतेत आला आहे. राज्यात जळगावनंतर नांदेडमध्ये सर्वाधिक केळीचे उत्पन्न घेतले जाते. जिल्ह्यातील अर्धापूर, कंधार, नांदेड तालुक्यासह परिसराला केळी उत्पादन चांगल्या प्रकारे होत आहे. त्यामुळे या भागात ऊसानंतर शेतकरी केळी पिकांची लागवड करत असतात.
रात्रदिवस कष्ट करुन लाखो रुपये खर्च करुन केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र, केळी काढणीला सुरुवात झाल्यापासून दरात घसरण होत आहे. मार्च महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण केळीला 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. त्यानंतर दरात अजून सुधारणा झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा केळीच्या दरात घट झाली. केळीला सध्या 400 ते 500 रुपये दर मिळत आहे. दरवर्षी नवरात्रो उत्सवाच्या काळात केळीच्या दरात वाढ होत असते. मात्र, यंदा केळीच्या दराने निच्चांक गाठला आहे. व्यापारी कोरोनाचे निमित्त साधून केळी ही अत्यंत कमी दरात घेत आहे. अतिवृष्टीमुळे केळीला रोगाची लागण झाल्याने केळी पिकण्यास सुरुवात झाली आहे. केळीचे घड झाडावरच असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच व्यापारी केळीची खरेदी करीत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च करुन शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही. यंदा केळी शेताच्या बाहेर काढणेसुद्धा शेतकऱ्यांना परवडत नाही. व्यापारी मनभाव केळी खरेदी करत आहेत. त्याचबरोबर गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरस मुळे सुद्धा चांगले उत्पन्न मिळून सुद्धा बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल फेकून द्यावा लागला त्यामुळे मोठ्या अडचणीत शेतकरी वर्ग सापडला आहे.