केव्हीके मध्ये शेतकरी शास्त्रज्ञ संवाद….
नेवासा।श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिवसेंदिवस होणारा हवामान बदल आणि शेती व्यवसाय यांची योग्य सांगड घालण्यासाठी केव्हीकेच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येणा-या तंत्रज्ञानाचा वापर शेतक-यांनी केला तर त्यांना निश्चितच फायदा होईल असे मत केव्हीके दहिगाव-ने चे प्रमुख डॉ. कौशिक यांनी उपस्थित शेतक-यांशी संवाद साधताना मांडले. या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त श्री. काकासाहेब शिंदे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी दूरसंचार प्रणाली द्वारे शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव औचित्याने मा. पंतप्रधान यांचे हस्ते देशातील चार कृषि विद्यापीठांना / संस्थाना हरित स्वच्छ परिसर अॅवार्ड देण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान मा. पंतप्रधानांनी राष्ट्रीय जैविक ताण व्यवस्थापन संस्था, रायपुर द्वारा विकसित ३५ नवीन वाण शेतकरी वर्गाला अर्पित केले. शेतक-यांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना जसे, जैवसंतृप्त वाण, माती आरोग्य पत्रिका, नीम कोटेड युरिया इ. विषयावर सविस्तर माहिती दिली.
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमासाठी व्यासपीठावर चारा उत्पादक शेतकरी सोमेश्वर लवांडे उपस्थित होते. त्यांनी देश-विदेशातून चारा पिकाचे वाण आणून स्वत:च्या शेतावर त्याची जोपासना कशी केली आणि या चारा वाणांचा प्रसार कशा पद्धतीने करतात याविषयी उपस्थित शेतक-यांशी संवाद साधताना माहिती दिली.
केव्हीके चे शास्त्रज्ञ माणिक लाखे व नारायण निबे यांनी उपस्थित शेतक-यांना सद्य पीक परिस्थितीवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कृषि विज्ञान केंद्र संचलित डेसी कोर्स चे फॅसिलीटेटर श्री. सुभाष कोरडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केव्हीके चे शास्त्रज्ञ सचिन बडधे यांनी केले तर आभार राहुल पाटील यांनी मानले.