
शेवगाव प्रतिनिधी (२२ नोव्हेंबर):-दीड लाख रुपये घेऊन शेवगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीचे परराज्यात लग्न लावून देणाऱ्या टोळीतील पाच जणांना शेवगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या.इतर दोघे फरार झाले आहेत.मुलीला जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त औरंगाबादमध्ये बोलावून त्यानंतर दमदम (मध्य प्रदेश) येथे नेऊन एका व्यक्तीशी तिचे लग्न लावून देण्यात आले होते.शेवगाव पोलीस ठाण्यात (रा. नकोर, जि. प्रतापगड, राजस्थान) या शहरातील एका महिलेने तिची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली एका अज्ञात इसमाने तिला फसवून नेल्याचे तक्रारीमध्ये म्हटले होते.शेवगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.या प्रकरणी गजानन काशीनाथ बिडे (रा. रोई, ता. अंबड, जि. जालना), लक्ष्मण तुकाराम पवार (जयभवानीनगर, औरंगाबाद), अनिल रमेशचंद्र चौधरी, मुकेश रमेशचंद्र चौधरी (दोघे रा. धमनार, जि. मनसौर, मध्य प्रदेश), अर्जुन जगदीश बसेर (रा. दमदम, मध्य प्रदेश) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकेश चौधरी भवरसिंग ठाकूर (रा. बासवाडा, राजस्थान) फरार झाले आहेत.याबाबत मुलीने दिलेल्या जबाबात म्हटले की, औरंगाबाद येथील इसमाने फोन करून जागरण गोंधळ कार्यक्रमात काम करण्यासाठी अडीच हजार रुपये देतो,असे सांगितले.ती मुलगी औरंगाबाद येथे गेली.त्यानंतर त्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तो मुलीला बसने इंदूर (मध्य प्रदेश) येथे घेऊन गेला. तेथे राहिल्यानंतर तो मुलीला पशुपतीनाथ मंदिर, प्रतापगड (राजस्थान) येथे घेऊन गेला.राजस्थानमधील बासवाडा येथे भवरसिंग या व्यक्तीच्या घरी तीन दिवस मुक्काम केला. तेथे मुलीला नवरदेव दाखविला. मुलीने पसंती दिल्यानंतर अनिल चौधरीसोबत तिचे लग्न लावून देण्याचे नियोजन केले. यावेळी त्यांच्यातील चर्चेतून दीड लाख रुपये घेऊन लग्न जमविल्याचे मुलीच्या लक्षात आले.