नेवासा प्रतिनिधी।सोनई जवळील वंजारवाडी (ता. नेवासा) येथील विकास बाळासाहेब पालवे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यश मिळविले आहे. मुळा एज्युकेशन संस्थेतील शिक्षक बाळासाहेब पालवे यांचे विकास हे चिरंजीव आहेत.
विकासने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वंजारवाडी येथे प्राथमिक शिक्षण, सैनिक स्कूल, प्रवरानगर येथे माध्यमिक शिक्षण घेतले. पुण्याच्या एस.पी कॉलेजमध्ये बारावी, तर व्हीआयटी कॉलेज, पुणे येथून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर दिल्लीत क्लास जॉईन करत यूपीएससीची तयारी सुरू केली. त्याच्या कष्टाला यश मिळाले असून त्याने देशात ५८७ वा क्रमांक मिळवला आहे. त्याच्या यशात विकासला वडील बाळासाहेब पालवे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल विकासचे माजी खासदार यशवंतराव गडाख, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, मुळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख, जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख, युवा नेते उदयन गडाख यांनी अभिनंदन केले आहे.