पाटस मधील वाबळे वस्तीत चोरट्यांचा धुमाकूळ! पावणे दोन लाख रुपयांची घर फोडी ..!
प्रतिनिधी गणेश गायकवाड
पाटस प्रतिनिधी। पाटस येथील वाबळे वस्ती परिसरात शनिवारी रात्री पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकाळ घातला. अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडली सोने आणि रोख रक्कम एकूण असा 1 लाख 61 हजारांचा ऎवज लंपास केला. कुत्र्यांच्या ओरड्याने नागरीक जागे झाल्याने इतर घरांमध्ये चोरी करण्याचा डाव फसला.
ग्रामस्थांनी आणि पोलीसांनी या चोरांचा शोध घेतला, मात्र रात्रभर पावसाची रिमझिम आणि अंधाराचा फायदा घेत चोरटे चोरी करून फरार होण्यास यशस्वी झालेत.
वाबळेवस्ती येथील अशोक तुकाराम तोंडे (वय 44 रा वाबळेवस्ती ) यांच्या घरात प्रवेश करून तोडफोड करून कपाटातील सव्वा दोन तोळे वजनाचा गंठण, अर्धा तोळे वजनाचा वेल तसेच रोख रक्कम अकरा हजार असा एकुण 1 लाख 21 हजारांचा ऎवज अज्ञात चोरट्यांनी चोरला.
छगन प्रभाकर लंवाड (रा.वाबळे वस्ती ) यांचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून पेटीत ठेवलेला एक तोळा सोन्याचा गंठण तसेच अर्धा तोळे सोन्याचे कानातील फुले असा ऎवज अज्ञात चोरानी चोरून नेला .
याबाबत दोन्ही घरमालकांनी पाटस पोलीस स्टेशन ला चोरीची फिर्याद दिल्याने अज्ञात चोरांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वाबळेवस्ती परिसरात चोरटे आल्याची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे उपपोलीस निरीक्षक रामभाऊ घाडगे, पोलीस हवालदार संजय देवकाते, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण, पोलीस शिपाई समीर भालेराव दत्तात्रय टकले आदींनी घटना स्थळी धाव घेतली.
घरफोडी झालेल्या घरांची पाहणी केली. श्वानपथक आणि ठसे तज्ञ बोलवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.