रेशनचा काळा बाजार, आरोपीस अटकपूर्व जामिन मंजूर
प्रतिनिधी : मयुर मांडलिक ( देशरत्न न्युज)
अहमदनगर : पारनेर पोलीस स्टेशन येथे अत्यावश्यक वस्तु अधिनियम कलम ३ व ७ अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपीस अहमदनगर येथील मा . सत्र न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामिन मंजूर केला.
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत
मौजे वडनेर बुझा, ता . पारनेर येथील स्वस्त धान्य दुकानामार्फत गरजू लाभार्थीना धान्य वितरण न करता काळ्या बाजाराने बाहेरील लोकांकडून जास्तीचे पैसे घेऊन धान्य विक्री केली जात होती याबाबत तक्रारदार श्री. पवार यांनी काळ्या बाजाराने धान्याची वाहतुक करत असताना गोरडे व कापसे या इसमांना रेड हॅण्ड पकडून पारनेर पोलीसांच्या ताब्यात दिले होते . पोलीसांनी गुन्हा दाखल न करता आरोपींना सोडून दिले. तक्रारदार पवार यांनी मा. तहसिलदार पारनेर व मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करुन देखील गुन्हा दाखल झाला नाही. सबब याबाबत तक्रारदाराने मा. ना. उच्च न्यायालयामध्ये रिट पिटीशन दाखल केले असता, गुन्हा का दाखल झाला नाही याबाबत मा. ना . उच्च न्यायालयाने विचारणा केली.
सबब, पुरवठा निरिक्षक, तहसिल कार्यालय, पारनेर यांनी रेशनच्या होत असलेल्या काळ्या बाजारा संदर्भात पारनेर पोलीस स्टेशन येथे अत्यावश्यक वस्तु अधिनियम कलम ३ व ७ अन्वये स्वस्त धान्य दुकान परवाना धारक यांच्या वतीने कामकाज पाहणारे बाबर, काळ्या बाजाराने धान्याची खरेदी करणारे गोरडे व कापसे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बाबर यास पोलीसांनी अटक केली. इतर आरोपी मात्र फरार होते. दरम्यान सदर गुन्ह्यासंदर्भात आरोपी कापसे याचे मागावर पोलीस होते. पोलीस कोणत्याही क्षणी अटक करतील याची चाहूल लागल्यानंतर आरोपीने अहमदनगर येथील मा. सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिन मिळणेकरीता अर्ज दाखल केला होता . सदर प्रकरणाची नुकतीच न्यायालयामध्ये सुनावणी झाली . आरोपीच्या वकीलांनी सदर गुन्ह्याशी आरोपीचा काहीही संबंध नसल्याचा युक्तीवाद केला. आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मा. सत्र न्यायालयाने दि . २१/०७/२०२२ रोजी आरोपीस अटी व शर्तीवर जामिन मंजूर केला.
आरोपीच्या वतीने ॲड. प्रशांत मोरे, ॲड. मंगेश औटी यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. देवा थोरवे, ॲड. सुभाष वाघ, ॲड. स्नेहल सरोदे, ॲड. अंशाबापु पुंड, ॲड. हनुमान सपकाळ, ॲड. सविता शिंदे यांनी सहकार्य केले.