लग्नाचे आमिष दाखवून लुटले ! आरोपीस जामीन मंजुर
दैनिक देशरत्न न्युज प्रतिनिधी मयुर मांडलिक
अहमदनगर – पारनेर पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ४०६, ४२०, ३९५ या कलमान्वये दाखल गुन्हयातील आरोपीस अहमदनगर येथील मा.सत्र न्यायालयाने नुकताच जामीन मंजुर केला .
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीगत
मौजे पुणेवाडी , ता . पारनेर येथील फिर्यादी विवाहीत पुरुषाला दुसरे लग्न करण्यासाठी मुलगी दाखवतो असे सांगून परिसरातील दोन इसम नामे अशोक व रामदास यांनी विश्वासात घेऊन लग्नाचे अमिष दाखविले. फिर्यादीस मुलगी दाखवून लग्न करुन देतो असे सांगून आरोपींनी मुलीच्या बापाला १ लाख रुपये द्यावे लागतील तसेच लग्नासाठी मंगळसुत्र घ्यावे लागेल असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादीने रकमेची व मंगळसुत्राची तजबीज केल्यानंतर फिर्यादी, फिर्यादीचे नातेवाईक, आरोपी अशोक, त्याची पत्नी असे सर्वजण मिळून मुलीस पाहण्याकरीता तवेरा गाडीने नगरला आले. आरोपी अशोक याने फिर्यादीला वाकोडी फाटा अहमदनगर येथे मुलगी पाहण्यास जावयाचे आहे असे सांगून सायंकाळी ४:३० वा . सुमारास वाकोडी शिवारातील शेतात नेले असता, आरोपी व त्यांचे ५ ते ६ साथीदारांनी फिर्यादी व बरोबरच्या लोकांना मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने काढून घेतल्याबाबत फिर्यादीने पारनेर पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ४०६, ४२०, ३९५ प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल केला होता. पहिली पत्नी हयात असताना दुसऱ्या लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पुरुषास लुटल्यामुळे सदरची घटना परिसरामध्ये चर्चेचा विषय बनली होती.
दरम्यान आरोपी अशोक याने नियमित जामीन मिळण्याकरीता अहमदनगर येथील मा.सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला. सदर अर्जाची नुकतीच सुनावणी झाली . आरोपीच्या वकीलांनी आरोपीस खोटया गुन्हयात अडकवण्यात आले असल्याचा युक्तीवाद केला. आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मा . सत्र न्यायालयाने आरोपीस अटी व शर्तीवर जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड. प्रशांत मोरे व ॲड. मंगेश औटी यांनी युक्तीवाद केला . त्यांना ॲड. देवा थोरवे, ॲड. सुभाष वाघ, ॲड. अंशाबापु पुंड, ॲड. एच. डी. सपकाळ, ॲड. स्नेहल सरोदे व ॲड . सविता शिंदे यांनी सहकार्य केले.