मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कधी होणार कारवाई ? तरुणाचे आत्महत्या प्रकरण:शेवगाव पोलीस स्टेशन पुन्हा चर्चेत…!
कमलेश नवले पाटील संपादक
अहमदनगर प्रतिनिधी। शेवगाव तहसील कार्यालयासमोरच भाऊसाहेब घनवट या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.या प्रकरणी गंगामाई शुगर इंडट्रीजमधील तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.मात्र मयत तरुणास घटनेच्या काही दिवस आधी मारहाण करणाऱ्या सदर पोलीस अधिकाऱ्यावर कधी कारवाई होणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे . मयत तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचा थेट उल्लेख आहे.त्यामुळे या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी , अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.अवैध व्यवसाय ,निवेदन,फिर्याद देण्यासाठी तसेच विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक मिळत नाही.आदी कारणामुळे आधीच शेवगाव पोलीस स्टेशनची नकारात्मक चर्चा आहे.दरम्यान ,भाऊसाहेब घनवट याने आत्महत्या केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनकडे फिरकला नाही.मयत घनवट याच्याकडे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलिसांनी दिलेल्या त्रासाचा स्पष्ट उल्लेख आहे.’ पीएसआय पाटील साहेबांनी एका रुममध्ये बसवून,दमबाजी करीत मारहाण केल्याचे तसेच मोठ्या भावाला जास्त मारहाण केली ते मला सहन होत नाही असे त्या पत्रात लिहिलेले आहे.ते पत्र व्हायरल होताच पोलीस स्टेशनमध्ये जमलेल्या नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करावा,अशी मागणी रात्री उशिरापर्यंत लावून धरत पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.
नातेवाईक आक्रमक होताच पोलीस खरे बोलले….
मयत तरुणाच्या आत्महत्येनंतर त्याच्याकडे कुठलीही चिट्ठी सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते . मात्र , नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला . त्यानंतर मयताच्या अंतर्वस्त्रात चिठ्ठी सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.दरम्यान , मयत भाऊसाहेब घनवट हा गंगामाई कारखान्यापासून होणाऱ्या वासाच्या विरोधात २०१९ पासून लढा देत असल्याचे त्याने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवरुन दिसते आहे . २०१ ९ साली तहसीलदार तसेच पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाचे छायाचित्रे त्याने टाकलेली आहेत .